पुणे : ऑनलाईन फ्रॉडचा मोठा दणका पुण्यातील शिक्षिकेला सहन करावा लागला आहे. महिलेने ऑनलाइन मागविलेले ड्रेस वेळेत न पोहचल्याने गुगलवरुन कुरीअर कंपनीचा मोबाईल शोधला. कंपनीने ५ रुपये दंड भरण्यासाठी सांगून कस्टमर सपोर्ट अॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यांनी दंड भरण्याचा प्रयत्न केला, परंतु, तो प्रयत्न अयशस्वी ठरला. त्याचवेळी त्यांच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या वेळी ६ व्यवहार होऊन तब्बल १ लाख ९५ हजार ९९९ रुपये ऑनलाईन काढले जाऊन फसवणूक झाली. ड्रेस पाहण्याची घाई महिलेला महागात पडली.
याबाबत नांदेड सिटी येथे राहणार्या ४७ वर्षांच्या शिक्षिकेने हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी अनुराग यादव लखनऊ ड्रेसेस येथून ऑनलाईन ड्रेसेस मागविले होते. त्याचे पैसेही पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पार्सल श्री मारुती कुरीअरने पाठविल्याचे कळविले. दोन दिवसानंतरही पार्सल न आल्याने त्यांनी कुरीअर कोठे आले, हे टॅक करण्याचा प्रयत्न केला. पण, ते टॅक होत नसल्यामुळे त्यांनी गुगलवरुन श्री मारुती या कुरीअर कंपनीचा कस्टमर केअर नंबर सर्च केला. तेव्हा त्याने आपले पार्सल येऊन परत गेल्याचे सांगितले. तुम्हाला परत हवे असेल तर त्याचा ५ रुपये दंड भरावा लागेल, असे सांगितले. त्यांना एक अॅपची लिंक पाठवून दिली. ते डाऊनलोड करुन अॅपद्वारे ५ रुपये पाठवा असे सांगितले.
दरम्यान, महिलेने संबंधित अॅप डाऊनलोड करुन ५ रुपये पाठविण्याचा प्रयत्न केला; परंतु, पैसे गेले नाहीत. तेव्हा त्यांनी पुन्हा कस्टमर केअरवर फोन करुन सांगितले. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने पैसे थोड्या वेळाने पाठविले तरी चालेल, असे बोलून फोन कट केला. त्यानंतर दुसर्या दिवशी त्यांनी मागविलेले कपड्याचे पार्सल आले. त्यामुळे त्यांनी ५ रुपये काही पाठविले नाही. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या मोबाईलवर एका मागोमाग त्यांच्या खात्यातून पाच वेळा पैसे काढून घेण्यात आले.
महिलेच्या बॅंक खात्यातून कट झालेले पैसे दीपक सिंह नावाच्या व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर झाले होते. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या दुसर्या बँक खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये काढून घेण्यात आल्याचा मेसेज आला. त्यांच्या मुलाने मोबाईलमधील कस्टमर सपोर्ट अॅप काढून टाकल्यानंतर हा प्रकार थांबला. फिर्यादी यांनी चौकशी केल्यावर त्यांच्या खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये मयान अली या आसाममधील सेंट्रल बँकेच्या खात्यात गेले. तसेच ९६ हजार रुपये पश्चिम बंगालमधील चंदीपूर दक्षिणमधील इंडुसीड बँकेचा खातेदार दीपक सिंह याच्या खात्यात गेल्याचे दिसून आले.
या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन वंगाडे करीत आहेत.