पुणे : वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून एक अभियंता महिला अंथरुणाला खिळून असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन डॉक्टरांविरुद्ध शनिवारी (दि. ३) डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभियंता महिलेच्या ३६ वर्षीय पतीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. प्रशांत यादव (रा. गुरुग्राम, हरियाना) व डॉ. स्वप्नील नागे (रा. नऱ्हे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
संबंधित महिला खराडी येथील कंपनीत अभियंता म्हणून काम करत होती. त्यांचे वजन जास्त असल्याने त्यांनी वजन कमी करण्याबाबतची माहिती घेतली होती. त्या वेळी त्यांना एरंडवणे भागातील डिझायर क्लिनिकची माहिती मिळाली. त्यानंतर अभियंता महिलेने संबंधित रुग्णालयाच्या क्रमांकावर संपर्क साधला आणि वजन कमी करण्याबाबतच्या उपचारपद्धतींची माहिती घेतली. त्या वेळी रुग्णालयातील स्वागतकक्षातील कर्मचाऱ्यांनी लिपोसक्शन शस्त्रक्रिया वजन कमी करण्यासाठी केली जात असल्याचे सांगितले. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०२२ रोजी या महिलेवर लिपोसक्शन शस्त्रक्रिया करून साडेचार लीटर मेद काढण्यात आले.
मात्र, शस्त्रक्रियेनंतर अभियंता महिला अत्यवस्थ झाल्याने तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रिया करताना भूल दिल्यानंतर नाडीचा वेग व रक्तदाब कमी झाला. तसेच प्राणवायूचा मेंदूला पुरवठा न झाल्याने मेंदूला इजा पोहचली. ही महिला खासगी रुग्णालयात तीन महिने उपचार घेत होती. मात्र, तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना घरी नेण्यात आले. तेव्हापासून ती अंथरुणाला खिळली आहे. डोळ्यांची उघडझाप करण्यापलीकडे तिला कोणतीही हालचाल करता येत नाही, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.