लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना महिलेला भरधाव वेगाने चाललेल्या एका दुचाकीने धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात असलेल्या राजेंद्र पेट्रोल पंपासमोर सोमवारी (ता.28) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साळूबाई अशोक जाधव (वय -65, रा. माळीमळा, कोल्हापुरी हॉटेलच्या मागे, लोणी काळभोर ता. हवेली जि.पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर समीर मिलिंद खेडेकर (वय-25, रा. गुरोळी, ता. पुरंदर, जि.पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रभावती रंगराव येवते (वय-33, माळी लोणी काळभोर ता. हवेली जि.पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रभावती येवते यांच्या मृत महिला साळूबाई जाधव या नात्याने आई आहेत. साळूबाई जाधव ह्या सोमवारी (ता.28) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडत होत्या. तेव्हा आरोपी समीर खेडेकर याने भरधाव वेगाने बुलेट चालवून साळूबाई जाधव यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात साळूबाई जाधव या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. बुलेट चालक समीर खेडेकर याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात चालवुन साळुबाई जाधव यांच्या मृत्युस कारणीभुत ठरला, अशी फिर्याद प्रभावती येवते यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार समीर खेडेकर याच्यावर बी एन एस कायदा कलम 281,125 (ब), 106 (1) व मोटार वाहन कायदा कलम 184, 119/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करत आहेत.