आळंदी : आळंदीत पद्मावती रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. डंपर व दुचाकीच्या अपघातात डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आळंदीतील पद्मावती रस्त्यावरील ओम गुरुदेव मंगल कार्यालयाजवळ शनिवारी (दि.१०) रोजी ही घटना घडली.
प्रीती योगेश धुमाळ (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेवेळी प्रीती धुमाळ आपल्या मुलासह दुचाकीने प्रवास करत होत्या. ओम गुरुदेव मंगल कार्यालयाजवळ येताच अपघात झाला आणि डंपरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दैव बलत्तर म्हणून सुदैवाने अपघात झाला त्यावेळी त्यांच्यासोबत असलेला चिमुकला बचावला.
प्रीती धुमाळ या चाकण रोडवरील इंद्रायणी हॉस्पिटमध्ये काम करत होत्या. दरम्यान, आळंदी शहरात सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत जड वाहनांना प्रवेश बंदी असतानाही जड वाहने बिनधास्तपणे ये – जा करत असल्याचे पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपूर्वी याच परिसरात अवडज वाहनांखाली जाऊन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आळंदी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.