शिरूर : शिरूर तालुक्यातील मुखई येथे दुचाकीत साडीचा पदर अडकून पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रेणुका बाबुराव वोइंदे (वय-२८, रा. धामारी, ता. शिरुर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धामारी येथील पाबळ शिक्रापूर रस्त्याने बाबुराव वोइंदे आणि रेणुका वोइंदे हे दोघे त्यांच्या दुचाकीवरून निघाले होते. मुखई गावातील मुक्ताई मंदिराजवळ आल्यानंतर रेणुका यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून गुंढाळला आणि रेणुका या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. यावेळी त्यांना उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हनुमान पवार यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.