कोरेगाव भीमा: रस्त्याच्या कडेने शतपावली करणाऱ्या वृद्ध महिलेला भरधाव कारने धडक देऊन ५० फूट अंतरावर फरफटत नेले. यात शरीराचे तुकडे झाल्याने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे वढू रस्त्यावर मंगळवारी (दि. ९) रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. केशरबाई अशोक निकम (वय ६४) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, केशरबाई निकम या जेवण झाल्यानंतर रात्री शतपावली करण्यासाठी घराबाहेर गेल्या. रस्त्याच्या कडेने जात असताना वढू बुद्रुक बाजूकडून कोरेगाव भीमाकडे येणाऱ्या भरधाव थार गाडीने केशरबाई यांना जोरदार धडक देत जवळपास ५० फूट फरफटत नेले. यात त्यांचे – शरीराचे कमरेपासून दोन तुकडे झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात झाल्यावर थार चालक फरारी झाला. शिक्रापूर पोलिसांनी काळया रंगाची थार गाडी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहेत.
अपघाताला जबाबदार कोण?
कोरेगाव भीमा परिसरात अल्पवयीन मुले भरधाव वेगात गाड्या चालवत आहेत. प्रशस्त काँक्रिट रस्ता, स्पोर्ट्स गाड्या यामुळे मुलांचे वेगावर नियंत्रण राहत नाही. अपघातामुळे होणाऱ्या परिणामांची त्यांना जाणीव नसते. त्यामुळे लोकांनी याबाबत जागरूक राहावे, अशी चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे. अपघात झाल्यास जबाबदार कोण, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.