लोणी काळभोर (पुणे): टाकीतून पाणी काढताना पाय घसरून एका वाहतूक पोलिसाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गाईंच्या गोठ्याच्या परिसरात सोमवारी (ता.1) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
भाग्यश्री प्रकाश कदम (वय -२५, कदमवाकवस्ती, ता.हवेली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे पती प्रकाश बाबूराव कदम (वय -३१) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश कदम हे पुणे शहर पोलीस दलात मागील 9 वर्षापासून कार्यरत होते. सध्या ते विमानतळ वाहतूक विभागात कर्तव्य बजावित आहेत. दरम्यान, प्रकाश कदम हे पत्नी भाग्यश्री व मुलगा प्रणय (वय -४) यांच्यासोबत कदम वाक वस्ती परिसरात राहत होते.
भाग्यश्री या नेहमीप्रमाणे सोमवारी (ता.1) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अंगणात पाणी मारण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा टाकीतून पाणी काढताना त्यांचा तोल जाऊन त्या पाण्याच्या टाकीत पडल्या. दरम्यान, भाग्यश्री यांनी दररोज प्रमाणे अंगणात पाणी न मारल्याचे त्यांच्या शेजारी महिलेला दिसले. तेव्हा त्यांनी भाग्यश्री यांना आवाज दिला. त्यानंतर परिसरात शोधले असता त्यांना भाग्यश्री आढळून आल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी पाण्याच्या टाकीजवळ पाहिले असता, त्यांना पाण्याच्या टाकीजवळ एक चप्पल व बकेट पडलेली आढळून आली.
त्यानंतर शेजारच्या महिलेने या घटनेची माहिती ताबडतोब भाग्यश्री यांचे पती प्रकाश कदम यांना सांगितली. त्यानंतर प्रकाश कदम तातडीने खाली आले. तेव्हा भाग्यश्री या टाकीत पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यानंतर भाग्यश्री यांना नागरिकांच्या मदतीने टाकीतून बाहेर काढून तात्काळ लोणी काळभोर येथील एका बड्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी भाग्यश्री यांना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहे.