वाघोली (पुणे): वडिलोपार्जित संपत्तीवरून वादातून महिलेने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सख्ख्या भावासह नातेवाइकांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कुुंदा आदिनाथ ढुस (५६, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कुंदा यांचा भाऊ संजय ठाणगे (वय ५०, रा. वैष्णवी सदन, साईनाथनगर, वडगाव शेरी), त्यांची पत्नी अनिता (४५), मुलगा ऋषीकेश (२८) आणि मंदा रमेश कुऱ्हे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुंदा यांची विवाहित मुलगी अनुपमा सुक्रे (३३, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
कुंदा यांचा वडिलोपार्जित संपत्तीवरून त्यांच्या भावाशी वाद सुरू होते. कुंदा यांना चार मुली असून त्यांचा विवाह झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वाघोली परिसरात राहणाऱ्या विवाहित मुलीकडे त्या आल्या होत्या. मुलीच्या घरीच त्यांनी पंख्याला स्कार्फ बांधून आपले जीवन संपवले.
वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून मामा आणि नातेवाइकांनी आई कुंदा हिला त्रास दिल्याने तिने आत्महत्या केल्याचे अनुपमा सुक्रे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानंतर अनुपमा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक निरीक्षक चेतन थोरबोले अधिक तपास करत आहेत.