पिंपरी : घर बांधण्यासाठी पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली असून या प्रकरणी सोमवारी (दि.३०) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अंजली गोवर्धन जाधव (वय २४, रा. बोडकेवाडी, माण, ता. मुळशी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती गोवर्धन गोपीचंद जाधव, (वय ३०), सासरे गोपीचंद जाधव (वय ५५), दीर गोरखनाथ, सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली यांचे वडिल देवीदास काशिराम राठोड (वय ४६, रा. मानोरा, जि. वाशिम) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना माण येथील बोडकेवाडीमध्ये घडली. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांची मुलगी अंजली यांना माहेराहून घर बांधण्यासाठी पैसे आणावेत, यासाठी तिचा शाररीक व मानसिक छळ केला. सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. त्यानुसार सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.