पिंपरी: ऑनलाइन पद्धतीने ड्रायफ्रूट खरेदी करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. अनोळखी व्यक्तींनी महिलेची अडीच लाखांची फसवणूक केली. आता ही घटना 27 जून ते 28 जून या कालावधीत नेहरूनगर पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी महिलेने 12 जानेवारी रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर सुरेंद्र सिंग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), रचना (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला ड्रायफ्रूट खरेदी करायचे होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून आरोपीस ऑर्डर दिली. त्यानंतर आरोपीने त्याच्याकडील संगणक खराब झाला असून एका मोबाईल क्रमांकावर यूपीआयद्वारे पैसे पाठवण्यास सांगितले. फिर्यादी महिलेने पैसे पाठवले असता त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी आरोपींनी फिर्यादीकडून दोन लाख 63 हजार 21 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. याबाबत पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.