पुणे : भारतीय संगीतातील लोकप्रिय संगीतकार जोडी म्हणजे अजय- अतुल यांची ओळख. पुणे येथील बालेवाडी मध्ये एका कार्यक्रमात त्यांना निमंत्रीत करण्यात आले होते. त्या कार्यक्रमामध्ये संगीतकार अजय-अतुल (Ajay Atul) यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप राधिका कुलकर्णी (Radhika Kulkarni) या आयोजक महिलेने केलेला आहे.
या महिलेने सहकाऱ्यांसह संगीतकार अजय-अतुल यांच्या विरोधात काळे झेंडे घेऊन रविवारी सायंकाळी अण्णाभाऊ साठे सभागृहासमोर निदर्शने केली आहेत. अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये फिरोदिया करंडक पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी अजय-अतुल यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रीत करण्यात आले होते. ते दोघे येणार असल्याचे समजताच कुलकर्णी यांनी निदर्शने करण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली.
यावेळी अॅड. राधिका कुलकर्णी म्हणाले की, त्या भागीदार असलेल्या गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीने २०१७ ला सुप्रसिद्घ संगीतकार अजय -अतुल यांची बालेवाडी स्टेडियम येथे कॉन्सर्ट आयोजित केली होती. या कॉन्सर्टसाठी अजय -अतुल यांना मानधन देण्यात आले. ईमेलवर सांगितल्याप्रमाणे ठरलेले नामवंत कलाकार त्यांनी या कार्यक्रमात सहभागी करणे अपेक्षित होते. परंतु या कार्यक्रमास मोठे कलाकार आले नाहीत. त्यामुळे तिकीट विक्रीच्या माध्यमातून गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीला अपेक्षित रक्कम जमा करणे शक्य झाले नाही. यामुळे या कंपनीला काही कोटी रुपयांचा फटका बसला. अनेक गुंतवणूकदार यामुळे हवालदिल झाले आहेत.
गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीला झालेल्या नुकसानीमुळे त्यांचे कोट्यवधी रुपये वसूल व्हावेत व गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत याकरिता कलर्स मराठी चॅनलला संबंधित लाईव्ह कॉन्सर्ट प्रदर्शित करण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. सुप्रसिद्घ संगीतकार अजय-अतुल यांनी या इव्हेंटचे आयोजक स्वतःच असल्याचे सांगून कलर्स मराठीला प्रसारणाचे हक्क विकले. त्यातून चांगलीच मोठी कमाई केलेली आहे. अशा तऱ्हेने त्यांनी गायक म्हणून मानधन घेतले. ठरलेले कलाकार तर नाही आणले, पुढे स्वतःच आयोजक असल्याचे भासवून कलर्स मराठीला हक्क विकले.
अशी फसवणूक करुन संगीतकार गायक अजय-अतुल या जोडीने ही रक्कम स्वत: ला हडप केलीय. याचा पाठपुरावा करणाऱ्या आयोजकांना प्रतिसाद दिला नाही असा आरोप अॅड. कुलकर्णी यांनी निदर्शनानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. कलर्स मराठी विरोधात यापूर्वीच अॅड.कुलकर्णी आणि त्यांच्या भागीदारांनी उच्च न्यायालयात खटला दाखल केलेला आहे.