पुणे : गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा, पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा… मुंढवा पोलिसांनी हे वर्णन सार्थ ठरवले आहे. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करुन मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून घर सोडून पुण्यात आलेल्या बुलढाण्यातील युवकाला मुंढवा पोलिसांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे तब्बल एक तपानंतर त्याचे आई-वडील भेटले. पोलिसांच्या या तत्परतेचे आणि सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संतोष कमलाकर पैठणे (वय ३८, रा. मु.पो. काटोडा, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे या मुलाचे नाव आहे. तो स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी २०१२ मध्ये पुण्यात आला होता. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. नैराश्य आल्याने तो राहत्या भाड्याच्या खोलीतून निघून गेला. याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाचा शोध घेऊन मुलाची आणि त्याच्या आईची तब्बल बारा वर्षानंतर भेट घडवून आणली.
शहरात जाऊन नशीब आजमावण्याची संतोषची इच्छा होती. पैठणे या त्याच्या गावी तो मुलांचे क्लास घेत होता. मात्र, घरातील आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. निरक्षर आई-वडील मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करत होते. त्यामुळे त्यांनी मुलाला पुण्याला जाण्यासाठी विरोध केला. यासाठीच २०१२ मध्ये घरात कोणाला काहीही न सांगता संतोष घरातून निघून पुण्यात आला. पुण्यात आल्यानंतर त्याने पार्ट टाईम काम करुन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरु केला. याचदरम्यान त्याने महाराष्ट्र लोकसेवा तसेच राज्यसेवा अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठीता परीक्षा दिल्या. मात्र, वारंवार अपयश येत असल्याने संतोषला नैराश्य आले. याच काळात तो मुंढवा येथील रेल्वे ब्रिजच्या शेजारी उज्वला शिवाजी पवार यांच्याकडे २०१७ पासून भाड्याने राहत होता.
दरम्यान, १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी दहाच्या सुमारास संतोष हा राहत्या भाड्याच्या खोलीतून काही न सांगता निघून गेला. त्यामुळे मुंढवा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दाखल तक्रारीचे तांत्रिक विश्लेषण करुन मुंढवा पोलिसांनी संतोषचा शोध घेतला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता संतोषने आपला भूतकाळ पोलिसांना सांगितला. संतोषचे नैराश्य व कुटूंबापासूनचा दुरावा याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी मुलाच्या मुळगावी सरपंच व आई-वडिलांशी संपर्क साधून माहिती दिली.
मुंढवा पोलिसांनी सरपंच व आई-वडील यांना मुंढवा पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. संतोषचे वडील कमलाकर धोंडू पैठणे (वय ६५) व आई कांताबाई कमलाकर पैठणे (वय-५८) हे मुंढवा पोलीस ठाण्यात आले. तब्बल १२ वर्षांनंतर आपल्या मुलाला पाहून आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आई-वडिल आणि मुलाची गळाभेट पाहून पोलिसांचे डोळे पाणावले.
मुंढवा पोलिसांच्या सतर्कतेमुळे १२ वर्षांपासून बेपत्ता असलेला मुलगा परत मिळाल्याने काटोडा गावचे सरपंच प्रदीप ढिगळे, संतोषचे आई-वडील व इतर नागरिकांनी पुणे शहर पोलीस दलाचे आभार मानले.