पुणे : टेरेसवर विद्युत जोडणीचे काम करताना गच्चीवर लावलेल्या शिडीवरुन पडून कामगाराचा (वायरमन) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना वडगाव शेरीतील वृंदावननगर भागात ४ जानेवारी रोजी दुपारी घडली होती. घडली आहे. कामगाराच्या सुरक्षेची काळजी न घेता हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून विद्युत विषयक कामे करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युसुफ शेख (वय ४७, रा. कोंढवा) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे.
याबाबत सलमा युसुफ शेख (वय ३९, रा. कोंढवा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राहुल वाघ आणि रोहन सतिश लो (रा. वृंदावन नगर, सैनिकवाडी, वडगाव शेरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, वडगाव शेरीतील वृंदावननगरमधील एका गृहप्रकल्पावर शेख हे विद्युतविषयक कामे करत होते. त्यावेळी गच्चीवर काम करत असताना लोखंडी शिडी घसरल्याने ते खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेख यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती साधनसामुग्री पुरविणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी याप्रकरणी दोन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक राजू शिंदे तपास करीत आहेत.