पुणे : जळगाव शहरातील विप्रो कंपनीतील सुमारे ३३ लाखांचे संतूर साबण घेऊन ट्रकचे चालक व मालक फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकणी दोन जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलाश श्रीराम गुजर (रा. भानूनगर, ता. जहाजपूर, जि. भिलवाडा, राजस्थान) पुष्पेंद्रसिंग सुदानसिंग चहर (रा. मुरलीविहार, देवरौठा शाहगंज, आग्रा, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालक आणि मालकाचे नाव आहे. लोडिंग मॅनेजर अनिलकुमार माईसुख पुनिया यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, विप्रो कंपनीचा साबणाचा माल तुमकूर (कर्नाटक) येथे पोचविण्यासाठी मामा ट्रान्स्पोर्ट कंपनीकडून ट्रकचा चालक कैलाश श्रीराम गुजर व मालक पुष्पेंद्रसिंग चहर यांचा ट्रक भाड्याने घेण्यात आला होता.
तसेच बुधवारी (ता.४ ) रोजी विप्रो कंपनीतून १८ टन १०० किलो वजनाचा संतूर साबण तुमकूर (कर्नाटक) येथे पोचविण्यासाठी मामा ट्रान्सपोर्टमार्फत ६२ हजार ४४५ रुपये भाडे ठरवून ट्रकमध्ये भरण्यात आली. त्यानंतर चालक व मालक यास ५० हजार रुपये देऊन गाडी रवाना करण्यात आली.
दरम्यान, सोमवारी (ता. ९) ला ट्रक व माल तुमकूर याठिकाणी पोहचला नाही. चालक आणि मालक दोघांचे फोन बंद लागला. चालक व मालक यांनी विश्वासघात करून ट्रकमधील ९८० बॉक्स सुमारे १८ टन १०० किलो वजनाचे सुमारे ३३ लाख २ हजार ६७८ रुपये किमतीचा माल अपहार केल्याचे लोडिंग मॅनेजरच्या लक्षात आले.
त्यानंतर लोडिंग मॅनेजर अनिलकुमार माईसुख पुनिया यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चालक कैलाश गुजर व मालक पुष्पेंद्रसिंग चहर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.