वाई : वाई शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील विशाल वाईन्स या दारूचे दुकानात गावगुंडांना मोफत दारू दिली नाही, म्हणून वाईन शॉपची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तसेच कामगारांना देखील मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर वाईतील वाई लिकर असोसिएशनच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील अधिकृत मद्या व्यवसाय असलेल्या विशाल वार्डन्स या दुकानात अज्ञात गुंडाने प्रवेश करत मोफत दारूची मागणी केली. मात्र, त्याला कामगारांनी विरोध केला. त्यानंतर आरोपींनी दुकानाची तोडफोड करत कामगारांनाही बेदम मारहाण केली. या घटनेत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गुंडावर कडक कारवाई करण्याची मागणी
या घटनेनंतर वाई असोसिएशनने वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांची भेट घेत निवेदन दिले. या निवेदनात संबंधित गुंडावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच आम्ही अनेक वर्षापासून अधिकृतरित्या शासनाच्या परवानगीने मद्या व्यवसाय करत आहे. मात्र, अलीकडच्या काळात अशा स्वरूपाची गुंडगिरी वाढली आहे.
वाईतील घटनेची आम्ही तक्रार केलीच आहे, मात्र भविष्यामध्ये अशा संदर्भातील घटना घडू नये, यासाठी कठोर कारवाईची गरज आहे. वाई मध्ये काही तडीपार व्यक्ती फिरत असल्याची गंभीर बाब लक्षात घ्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.