पुणे : लोकसभा निवडणुका जाहीर होताच गेल्या काही दिवसांपासून शरद पवार स्वतः पुणे किंवा माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. आता स्वतः शरद पवारांनीच या प्रश्नाचे उत्तर देत, सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी पुण्यातून किंवा माढ्यातून निवडणूक लढवणार नाही, तर यापुढे मी कधीच निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. या घटनेचा केजरीवाल यांनी निषेध केला. ईडी, सीबीआय या एजन्सींचा गैरवापर सुरु असल्याबद्दल त्यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. अकाऊंट फ्रिज करणे यातून देशाचा, मोठ्या पक्षाचा प्रचार थांबवण्याचा प्रयत्न होतोय, याबर त्यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले जात आहे, देशात कोणत्याही पक्षात अशी कारवाई झाली नव्हती. हे धोरण चुकीचेव लाजिरवाणे आहे. या गोष्टींचा मी निषेध करतो, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. केजरीवालांसोबत ताकदीने उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, माढ्याच्या जागेबाबत बोलताना शरद पवारांनी आपला मनातील उमेदवार महादेव जानकर असल्याचे सांगितले. मात्र सगळ्यांनी ऐकले पाहिजे. ज्योती मेटे यांच्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. महायुतीची जागा निश्चित झाल्यावर आणखी माणसे येतील, असेही पवार यांनी सांगितले.
काँगेसची खाती गोठवली, देशातील महत्त्वाच्या पक्षाला साधनसामग्री नाही. याआधी कोणत्याही निवडणुकीत असे झाले नाही. केजरीवाल यांनी धोरण तयार केले, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांचे धोरण चुकले असेल तर लोकांसमोर जा, कोर्टात जा, त्यांना अटक करणे चुकीचे आहे. केजरीवाल यांना अटक झाली याचा अर्थ केजरीवाल यांच्या १०० टक्के जागा निवडून येतील. आणिबाणीत झाले नाही ते आता होत आहे. इंडिया म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आज ८० ते ९० टक्के लोकांची पसंती केजरीवाल यांना आहे. सरकारने जमा करायचे ते जमा केले आहे, म्हणून भाजप गप्प बसली, असे सांगत शरद पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले.