पुणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर ७ आमदारांना संधी देण्यात आली आहे. मात्र, या आमदारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना स्थान न मिळाल्याने अनेक पदाधिकारी नाराज आहेत. पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आपणाला पक्षाने डावलल्याचं सांगत पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. त्यांनंतर शहरातील जवळपास ८०० हुन अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. मात्र, आता अखेर नाराज दीपक मानकरांची समजूत काढण्यात अजित पवारांना यश आले आहे.
या सर्व प्रकरणाबाबत दिपक मानकर यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भेट घेतल्याचे नमूद केले आहे. ते म्हणाले, आपल्याला योग्य वेळी योग्य न्याय दिला जाईल’ असा वादा दिल्याचं मानकर यांनी सांगितलं. शिवाय अजितदादा पुणे शहर कार्यकारणीच्या कामावर समाधानी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
दीपक मानकर काय म्हणाले?
माझ्यावर विश्वास ठेऊन पुणे शहरातील 850 पेक्षा जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सामूहिक राजीनामे दिले आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. गेल्या काही दिवसात आपल्या पक्षात घडलेल्या घटनांची योग्य दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शुक्रवारी (ता.18) रोजी सकाळी प्रदेश कार्यालय, मुंबई येथे वेळ देत माझी भेट घेऊन शहराध्यक्ष या नात्याने पुणे शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला.
अजितदादा हे पुणे शहर कार्यकारिणीवर समाधानी आहेत. त्यांचे पुण्यातील कार्यकर्त्यांवर विशेष प्रेम असून कोणत्याही पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही, असं ठामपणे सांगितलं. शहरातील सर्वच कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आपण तयार केलेले संघटन कौतुकास्पद असून त्यांच्या बळकटीसाठी आणि पक्षवाढीसाठी उपयोगी होणाऱ्या विधानपरिषदेसाठी आपण मागणी केली होती.
परंतू काही कारणास्तव ती मागणी पूर्ण करता आली नाही. तरी येत्या काळात योग्य वेळी योग्य न्याय दिला जाईल. तसेच शहरातील सर्वच कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या कामाची प्रशंसा करत अजितदादांनी या कार्याची योग्य पोचपावती लवकरच दिली जाईल, असा ठाम विश्वास मला दिल्याचंही मानकर यांनी यावेळी सांगितलं.
तर पुणे शहर आपला बालेकिल्ला असून कोणत्याही कार्यकर्त्यांनी नाराज न होता येत्या विधानसभेत महायुतीचे जोमाने काम करून आपल्या पक्षाची ताकद दाखवून देऊया. मी आपल्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा शब्द अजितदादांनी आम्हाला दिला आहे. त्यामुळे आता आम्ही आमची एकी अशीच ठेऊन आम्ही येत्या विधानसभेला जोमाने सामोरे जाणार आहोत, असं दीपक मानकर यांनी स्पष्ट केलं आहे.