दीपक खिलारे
इंदापूर : भांडगाव-आलेगाव खुर्द येथे भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर जलसंपदाचे अधिकारी व संबंधितांची आठ दिवसांत बैठक घेतली जाईल. तसेच जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या बंधार्याच्या मंजुरीसाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.11) दिली.
भीमा नदी पात्रात भांडगाव (ता. इंदापूर) आलेगाव खुर्द (ता. माढा) दरम्यान भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात यावा, या मागणीसाठी माढा तालुक्यातील आलेगाव खुर्द, रुई, गारअकोले तसेच इंदापूर तालुक्यातील भांडगाव, सुरवड, बावडा परिसरातील शेतकऱ्यांनी भीमा नदीपात्रात आलेगाव खुर्द (ता. माढा ) हद्दीत गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते. या धरणे आंदोलनसंदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी प्रशासन व आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधला. सोलापूर जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग, पालकमंत्री यांची बैठक घेऊन बंधारा बांधणे व इतर मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली. त्यानंतर प्रशासनाच्या विनंतीनुसार आंदोलनकर्त्यांनी सोमवारी (दि.11) आंदोलन मागे घेतले.
या धरणे आंदोलन समाप्तीप्रसंगी माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे, टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष ऍड. शरद जामदार, इंदापूर तालुका भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष राहुल पाटील, निरा भिमा कारखाना संचालक दादासाहेब घोगरे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, किसन जावळे, सुभाष गायकवाड, सुरवड-भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय घोगरे, अंकुश गायकवाड, तात्यासाहेब कोरटकर आदीसह शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, या धरणे आंदोलनास पाठिंबा दिल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, अभिजित पाटील, रणजित शिंदे आदींचे आंदोलनकर्ते शेतकरी हरिभाऊ माने व सहकाऱ्यांनी आभार व्यक्त केले.
टणू, भाटनिमगाव बंधारे भरून घेण्याची मागणी
यावेळी धरणे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी टणू, भाटनिमगाव, शेवरे येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याने भरून घेण्याची मागणी केली. सदरची आंदोलनकर्त्यांची मागणी योग्य असून, शासनाकडून मागणी मान्य करून घेऊ, असे हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना नमूद केले.