योगेश मारणे
पुणे : घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी व विरोधक दोन्ही बाजूने आज(दि.०९)सकाळी शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथील साखर संकुल येथे भेट घेतली. यावेळी कारखाना सुरु करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली असल्याचे शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी ‘पुणे प्राईम’शी बोलताना सांगितले.
शिष्टमंडळामध्ये शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार, शिरूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रवींद्र काळे, घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष,संचालक दादा पाटील फराटे, राष्ट्रवादीचे राजेंद्र कोरेकर, माजी संचालक सुधीर फराटे इत्यादी मान्यवर उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी शिष्टमंडळासह उपस्थित होते.
घोडगंगा साखर कारखाना सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आला असून सत्ताधारी व विरोधक दोन्ही बाजूने शिष्टमंडळ पुणे येथील साखर संकुल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रशासक नेमावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे तर कारखाना सुरू करण्यासाठी शासनाने कारखान्याला मदत करावी अशी आग्रही मागणी सत्ताधारी संचालक मंडळाच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी शिष्टमंडळासोबत ऋषीराज पवार यांच्याशी चर्चा करताना घोडगंगा कारखाना सुरू करण्यासाठी आपण सकारात्मक असल्याचे सांगितले. मात्र, कारखान्याच्या संचालक मंडळाने साखर आयुक्तांना सर्वतोपरी सहकार्य करावे व कारखान्यासंदर्भात सर्व माहिती पुढील पंधरा दिवसांमध्ये साखर आयुक्तांना द्यावी असे आवाहन केले. त्यानंतर त्यावर तोडगा काढून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.