पुणे : मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर आज पहिला सेमी फायनल सामना पार पडणार आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान हा सामना रंगणार असून, प्रेक्षकांचा उत्साह वाढला असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडिअममध्ये आग लावू, अशी धमकी ट्विटरवरून मुंबई पोलिसांना दिली आहे. या पार्श्वभूमीवर सामन्यावर भितीचे सावट असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
वर्ल्ड कप २०२३ मधील हा सामना फायनलचे तिकीट पक्के करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यासाठी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. मात्र, त्यापूर्वीच ट्विटरवरून ही धमकी मिळाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी स्टेडिअममधील आणि परिसरातील बंदोबस्त वाढवला आहे. सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आयडी कार्ड तपासले जात आहे. बॉम्बशोधक पथकही स्टेडिअममध्ये दाखल झाले असून, कसून शोध घेण्यात येत आहे. भारत-न्युझीलंड सामन्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हजारो संख्येने प्रेक्षक वानखेडेवर दाखल होत असून, त्याच पार्श्वभूमीवर सर्व सुरळीत पार पडावे, यासाठी पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत. स्टेडियममध्ये प्रवेश करताना पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत. वानखेडे स्टेडियमच्या सर्व दहा गेट समोरील रस्त्यावर पार्किंगला मनाई केली आहे. एक किलोमीटरच्या परिघात पोलिसांनी पार्किंगची व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पेन, पेन्सिल, मार्कर, कोरे कागद, बॅनर्स, पोस्टर्स तसेच बॅग, पॉवर बँक, नाणी तसेच ज्वलनशील पदार्थ, आक्षेपार्ह वस्तू, तंबाखूजन्य पदार्थ आणू नयेत, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.