पुणे : लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे, तो नणंद-भावजय अशा होणाऱ्या लढतीमुळे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात बारामतीची लढत होण्याची शक्यता असल्याने राज्याच्या नजरा बारामतीवर आहेत. मात्र, आता बारामतीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या लढतीच्या चर्चा काही प्रमाणात मागे पडल्या आहेत. सध्या बारामती मतदारसंघामध्ये चर्चा आहे, ती म्हणजे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या आव्हानाची.
माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात एल्गारच पुकारला आहे. शिवतारे बारामतीची लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी यापूर्वीच केली आहे. त्यानंतर आता शिवतारे यांनी केलेल्या बंडाचे परिणाम राज्यभर उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार अजित पवार गट करणार नाही, अशी भूमिका मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंनी घेतली आहे. त्यामुळे आता महायुतीत बारामतीवरुन पेच तर निर्माण होणार नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी विजय शिवतारे यांना समजावलं आहे. मात्र, तरीही शिवतारे यांची बंडखोरी कायम राहिली, तर त्याचे परिणाम राज्यभर उमटतील. शिवसेना शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार राष्ट्रवादी करणार नसल्याची भूमिका पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे.
तसेच मावळ लोकसभेत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंचा प्रचार न करून, अजित पवारांचा गट पार्थ पवारांच्या पराभवाचा बदलाही घेऊ इच्छितो, अशी चर्चा सुरु आहे. याबाबत मात्र पिंपरीचे आमदार बनसोडे यांनी थेट उत्तर देणे टाळले आहे. आम्ही प्रचार करणार नाही याचा अर्थ विरोधकांचा प्रचार करू असं नाही. आम्ही तटस्थ भूमिका घेऊ, असं देखील अण्णा बनसोडे स्पष्ट केले आहे.