पुणे : शिरूर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असेल, याबाबतची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर मंगळवारी (ता. १९) शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आढळरावांना डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात रिंगणात उतरणार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा आढळरावांच्या मार्गात अडसर ठरू शकतो. त्यांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान अजित पवार यांच्यासमोर आहे. यासाठीच आज ते मोहितेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन समजूत काढणार असल्याची माहिती मिळत आहे. मोहिते पाटील अजितदादांचा शब्द पाळणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मोहितेंची समजूत काढण्यात अजितदादा यशस्वी झाल्यास आढळरावांचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा होणार आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात उतरणार आहेत. एकेकाळी राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते हे आढळरावांना असलेल्या विरोधावर ठाम आहेत. आढळरावांच्या उमेदवारीला शिरुरमधून काही नेते, कार्यकर्त्यांचा विरोध आहे. हा विरोध टाळण्यासाठी अजित पवार शिरुर मतदारसंघातील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आज संवाद साधणार आहेत.
दरम्यान, आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये २० वर्षांपासून संघर्ष आहे. आढळरावांना जर राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर आपण राजकारणातून संन्यास घेणार असल्याचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी यापूर्वीच सांगितले आहे. आढळरांवाना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिल्यास त्यांचे काम करण्यापेक्षा राजकारण सोडून घरी बसेन, अशी ठाम भूमिका मोहिते पाटलांनी घेतली आहे. आता अजितदादांना मोहितेंचे समजूत काढण्यात यशस्वी होतील का, हे आज समजणार आहे.
डॉ. अमोल कोल्हेंचा पराभव करण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. अजितदादांनी कोल्हेंच्या विरोधात आढळरावांना उमेदवारी देऊन तगडे आव्हान दिले आहे. यामुळे शिरूरची निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.