पिंपरी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला न सुटल्यास महाविकास आघाडीत ज्या पक्षाला ही जागा मिळेल, त्या पक्षात प्रवेश करण्याचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवडमधील माजी नगरसेवकांनी केला आहे. याबाबत आगामी दाेन दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना ठरावाची प्रत देण्यात येणार आहे. त्यामुळे चिंचवडच्या जागेवरून महायुतीत मोठा पेच निर्माण होणार आहे.
ताथवडे येथे शुक्रवारी (४ ऑक्टोबर) चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या सर्व माजी नगरसेवकांची बैठक झाली. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, विनोद नढे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, संतोष कोकणे, कैलास बारणे, माजी नगरसेविका उषा काळे यावेळी उपस्थित होते. चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाचा विद्यमान आमदार असल्याने महायुतीच्या ठरलेल्या सूत्रानुसार ही जागा भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीतील माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही भेट घेतली हाेती. त्यानंतर शुक्रवारी या माजी नगरसेवकांनी ताथवडेत बैठक घेतली. निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असलेले नाना काटे यांच्यासह बहुतांश माजी नगरसेवक बैठकीला उपस्थित होते.