पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. तर, इच्छुक उमेदवारांनीही प्रमुख पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. असं असताना शरद पवारांची भेट घेणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढताना दिसत आहे.
माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आणि भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी विधानसभेला तुतारी फुंकणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.
अजित पवार गटाचे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे हे तुतारी फुंकणार असल्याचे त्यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी अखेर जाहीर केलं आहे. आजच्या शरद पवार यांच्या भेटीनंतर विक्रांत लांडे यांनी प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळं अजित पवारांना बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात मोठा धक्का बसला आहे.
शरद पवारांनी तारीख दिली की विलास लांडे घड्याळाच्या हातानेचं तुतारी फुंकणार आहेत, असं विक्रांत लांडे आता ठामपणे सांगत आहेत. कालच्या प्रमाणेच विलास लांडे यांनी यापूर्वी ही अनेकदा शरद पवारांच्या भेटी घेतल्या आहेत. मात्र, ते स्वतःहून घरवापसीच्या प्रवेशावर कधीचं बोलले नाहीत, नेहमी त्यांनी संभ्रमाचं राजकारण खेळलेलं दिसत आहे. त्यामुळे जोपर्यंत विलास लांडे हातात तुतारी घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचा प्रवेश निश्चित कसा मानायचा? अशी चर्चा शहरात रंगताना दिसत आहे.