पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कट्टर विरोधक पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांविरोधात मैदानात उतरले आहेत. तसेच आगामी बारामती लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा विजय शिवतारे यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना चिन्ह कोणते असेल, हे अद्याप अस्पष्ट आहे. पण मी आगामी लोकसभा लढवण्यावर ठाम असल्याचं शिवतारे सांगितले.
माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले की, “खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात बारामती लोकसभा निवडणूक लढणार आहे. या मतदारसंघातील 5 लाख 80 हजार मतदार पवार कुटुंबियांच्या विरोधात आहेत, त्या मतदारांसाठी मी पर्याय आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रवृत्ती विरोधात आणि सुप्रिया सुळेंनी गेली पंधरा वर्ष काहीच काम केलं नाही, म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार असल्याचे शिवतारे म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे, असंही विजय शिवतारे यांनी म्हटले.
शिवतारेंची पवार कुटुंबीयांवर तोफ
बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसल्याचा म्हणत, पवार कुटुंबीयांवर शिवतारे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. विजय शिवतारे पुरंदर तालुक्यातील महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या खेळ खेळू पैठणीचा कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात तब्बल 5 लाख 80 हजार मतदार असलयाचा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे. तसेच येणाऱ्या लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णयही शिवतारे यांनी घेतला आहे. आता गुलामगिरी करणार नसल्याचा इशारा शिवतारे यांनी दिला आहे. आपण पवार कुटुंबियांनाच का मतदान करावे? बारामती मतदार संघ कोणाचा सातबारा नाही, असं विजय शिवतारे म्हणाले.
तर लढत तिरंगी होणार?
बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विराधात तब्बल 5 लाख 80 हजार मतदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत आरपारची लढाई करणार आहे. तुमच्या सर्वांची साथ हवी, असे म्हणत सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे, असे विजय शिवतारे म्हणाले आहेत. त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणुक तिरंगी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.