पुणे : पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात सिलिंडर घालून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना विश्रांतवाडीतील धानोरी परिसरात रविवारी (दि. १३) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. माधुरी मनोहर मोरे (वय-४७, रा. मुंजाबा वस्ती, धानाेरी, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पाेलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. मनोहर मोरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय?
धानोरीतील मुंजाबा वस्ती परिसरात मोरे दाम्पत्य राहायला आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मनोहर हा माधुरी यांच्या चारित्र्याचा संशय घेऊन त्यांचा छळ करत होता. तसेच त्यांना सतत मारहाण करायचा. रविवारी मध्यरात्री मोरे दाम्पत्यात पुन्हा वाद झाला. याच वादातून मनोहरने स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरची टाकी माधुरी यांच्या डोक्यात मारली. डोक्यावर वर्मी घाव बसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या माधुरी यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी पती मनोहरला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त जाधव यांनी दिली.