बारामती : बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथे आपला नवरा दुसऱ्या महिलांशी बोलत बसल्याच्या रागातून पतीला पत्नी आणि मुलाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही तर दोन अनोळखी व्यक्तींना फोन करून बोलावून घेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सचिन दगडू विधाते (वय-३८, रा. कुभारकरेवस्ती वंजारवाडी ता. बारामती) असं मारहाण केलेल्या पतीचं नाव आहे. हा प्रकार १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.
याप्रकरणी पती सचिन विधाते यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी पत्नी निर्मला सचिन विधाते, मुलगा यश सचिन विधाते आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बारामती येथील उत्कर्षनगर रोडवर फिर्यादी विधाते हे त्यांच्या ओळखीच्या महिलांशी बोलत उभे होते. त्यावेळी त्यांची पत्नी निर्मला विधाते या तिथे आल्या. यावेळी त्यांनी त्या महिलांना तुम्ही माझ्या नवऱ्याशी बोलत उभे का राहिला असं म्हणून त्यांना शिवीगाळ तसेच दमदाटी केली. यावेळी फिर्यादी पती पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता.
रागाच्या भरात पत्नीने दोन अनोळखी व्यक्तींना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांची पत्नी निर्मला विधाते, मुलगा यश विधाते आणि दोन अनोळखी व्यक्तींनी सचिन विधाते यांना हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तर त्यातील एका व्यक्तीने धारदार हत्याराने फिर्यादीच्या कमरेचे वरील भागास आणि डाव्या हाताला वार करून गंभीर दुखापत केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.