पुणे : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरती उपोषणाला बसला आहे. दरम्यान, राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपुर्वी शरद पवारांची भेट घेतली होती तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होत. त्याआधी शरद पवारांवर विरोधक आरक्षणाच्या बैठकीला उपस्थित नव्हते म्हणून भुजबळ यांनी हल्लाबोल केला होता. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. यावर आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी भाष्य केलं आहे. सोबतच त्यांनी आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या बैठकीला विरोधक का नव्हते गेले? यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
महाराष्ट्राचं हित हवं असेल
छगन भुजबळ घरी आले, ते मला भेटले, त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत काही गोष्टी सांगितल्या. महाराष्ट्राचं हित हवं असेल तर तुम्ही या चर्चेमध्ये येण्याची गरज असल्याचं भुजबळांनी म्हटलं. मनोज जरांगे आणि मुख्यमंत्र्यामंध्ये काय चर्चा झाली त्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. जरांगेचं उपोषण सुरू असताना काही मंत्र्याचं शिष्टमंडळ देखील गेलं होतं. त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यातील सुसंवाद आम्हाला माहिती नाही. त्यांची माहिती घेऊन बैठक घेऊ असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
विरोधकांनी बैठकीला पाठ का फिरवली?
आम्ही त्या मिटींगला न जाण्याचं एकच कारण होतं. दोघांशी सत्ताधारी पक्ष बोलत आहेत. दोघांसोबत चर्चा केल्यानंतर काही लोक मोठी-मोठी विधाने करत आहेत. पण प्रत्यक्षात त्यांच्यात काय चर्चा झाली, प्रस्ताव काय झाला त्याबाबत माहिती नाही. म्हणून आम्ही ठरवलं जोपर्यंत चर्चा काय झाली? त्याचा प्रस्ताव काय झाला ते समोर येत नाही. तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यामुळे आम्ही बैठकीला गेलो नव्हतो, असंही शरद पवार यांनी सांगितले.