पुणे : राज्यात पवार कुटुंबाची दिवाळी हा चर्चेचा विषय असतो. मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गोविंदबागेत दरवर्षी दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो. या सोहळ्याला पवार कुटुंबातील सर्व सदस्य हजर असतात. पक्षाचे विविध नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राज्यभरातून सामान्य जनताही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत असते. गत साली राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सहकाऱ्यांना यंदाच्या गोविंदबागेतील पाडव्याला दांडी मारली आहे. अजित पवार यांनी मूळगावी काटेवाडीत वेगळा पाडवा मेळावा भरवला आहे.
दिवाळी पाडव्यानिमित्त शनिवारी सकाळपासून गोविंदबागेत कार्यकर्ते पदाधिकारी तसेच सामान्य जनतेने मोठी गर्दी केली होती. आलेल्या जनतेचे अभिवादन शरद पवार प्रसन्नपणे स्वीकारत होते. त्यांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देत होते. विधानसभा निवडणुकीच वातवरण असल्याने आलेले लोक शरद पवार यांना आपापल्या भागातील राजकीय वातावणाची माहिती देत होते. परंतु गोविंदबागेतील पाडवा मेळाव्याला अजित पवार यांची गैरहजेरी मात्र दिसून येत होती. याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आले.
काय म्हणाले अजितदादा?
अजित पवार म्हणाले, पूर्वी काटेवाडीमध्ये पाडवा साजरा व्हायचा. साहेबांना भेटायला लोक इकडेच यायचे. त्यानंतर पुढे गोविंद बागेची जागा घेऊन तिकडे मेळावा व्हायला लागला. बारामतीमधील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गोविंदबागेत जाणे सोयीचे होते म्हणून गोविंद बागेत मेळावा व्हायला लागला. आजही कार्यकर्त्यांची गर्दी खूप होती. लोकांनीही सण साजरा करायचा असतो. त्यांनाही घरी जाण्याची घाई असते. त्यामुळे गर्दी विभागली जावी, कार्यकर्त्यांना लवकर घरी जाता यावे म्हणून मी गोविंद बागेत गेलो नाही, असं उत्तर अजित पवार यांनी दिल आहे.