पुणे : राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अजित पवारांना आज जोरदार झटका बसला आहे. लोणावळ्यातील अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. बाप बाप असतो, आमचा बाप दहा दादा तयार करू शकतात. पण ते दादांना शक्य होणार आहे का?, मुळात दादा जनतेचा नव्हे तर स्वतःचा विकास करायला गेलेत. मात्र आम्हाला संविधान वाचवायचं आहे. यासाठी आम्ही शरद पवारांची तुतारी फुंकतो, असे म्हणत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. लोणावळ्यात अजित पवारांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
देशाच्या संविधानाला कमकुवत करण्याचे काम सध्या सुरु आहे. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. राज्यातील पुरोगामी संस्कृती तोडून, पक्ष मोडून अनेकांची घरे उद्ध्वस्त करण्याची कामे सुरु आहेत. शरद पवार हे लोकशाही टिकवणारे आणि रोजगार देणारे नेते आहेत. अजित पवार फक्त खुर्ची वाचवण्यासाठी भाजपसोबत गेल्याचा आरोप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हे कार्यकर्ते अजित पवार गटात होते. मात्र, या कार्यकर्त्यांनी आता अजित पवारांना रामराम करत शरद पवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
या वेळी बोलताना आक्रमक कार्यकर्ते म्हणाले की, अजित पवारांच्या अनेक गोष्टी आम्हाला खटकल्या आहेत. ज्या भाजपबरोबर एवढी वर्षे विरोधात लढलो, आज त्यांच्याबरोबरच काम करायचे हे न पटण्यासारखे आहे. आम्ही सगळेच शरद पवारांच्या विचारांशी सहमत आहोत आणि आम्हीच त्यांचा वारसा पुढे नेणार आहोत. कार्यकर्त्यांचा हा पवित्रा अजित पवारांना लोणावळ्यात मोठा धक्का मानला जात आहे.