पुणे : पुण्याचा विकासाचा कार्यक्रम गेल्या अडीच वर्षांत निश्चित करण्यात आला आहे. आता त्याला गती देणे महत्त्वाचे असून ती गती आम्ही देऊ, असे विधान मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी पुण्यात आले होते. उद्घाटनापूर्वी त्यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोल्ट होते. ‘पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. वाचन संस्कृतीला चालना देणारे कार्यक्रम होत आहेत. गेल्या वर्षी सुद्धा मी या कार्यक्रमाला आलो होतो. पुणेकरांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला होता. सांस्कृतिक राजधानीत अशा प्रकारच्या कार्यक्रमाने माझ्या कामाची सुरुवात होणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे,’ असे फडणवीस म्हणाले.
दादरच्या हनुमान मंदिराविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, न्यायालयाने मागच्या काळात निर्णय देऊन मंदिराची वर्गवारी निश्चित केली आहे. जुनी मंदिरं ही त्या वर्गवारीनुसार नियमित करता येतात. याबद्दल रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून नियमातील तरतुदीनुसार निश्चित मार्ग काढणार आहोत.
पुण्याचे पालकमंत्री भाजपला मिळणार की राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार? याबाबत प्रश्न विचारला असता, ‘सर्व माहिती लवकरच मिळेल’ असे उत्तर फडणवीस यांनी दिले.