ओतूर: जुन्नर तालुक्यात गावोगावी सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. कोण किती मतांनी विजयी होणार ? कोणत्या भागातून लीड़ कोणाला मिळणार ? असे प्रश्न उपस्थित करून पैजा लागत आहेत. याशिवाय विविध प्रकारच्या अफवांना ऊत आला आहे. अणे-माळशेज पट्टयातील ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हान, पाचघर, उदापुर, हिसार सदढ, पिंपळगाव जोगा, संगनोरे, घोलवड, ठिकेकरवाडी, डुंबरवाडी, उंब्रज, आदी गावांत चुरशीने शांततेत मतदान पार पडले. बुधवारी सकाळी सातपासून मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदार रांगेत उभे होते. सर्वच मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
त्यामुळे मतदानाची टक्केवारी या निवडणुकीत वाढलेली पाहायला मिळाली. या मतदारसंघातील जनतेची मते कोणाच्या पथ्यावर पडणार याची खात्री देणे, अनेकांना कठीण ठरते. अनेक ठिकाणी आपलाच उमेदवार विजयी होणार, याविषयी एक हजार रुपये ते पाच हजार रुपयांच्या पैजा लागल्या आहेत. सदर पैजेबाबत लेखी करार लिहून घेतले आहेत. मतदान केंद्रावर कोणत्या ठिकाणी कशी मते पडणार याबाबत अफवा मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागल्या आहेत.