युनूस तांबोळी
शिरूर : रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील कंपनीच्या प्रदुषणामुळे निमगाव भोगी, कारेगाव, आण्णापुर, सरदवाडी, रामलिंग आणि शिरूर शहर येथील जमीनी नापिक झालेल्या आहेत. पिण्याच्या पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आहेत.
शिरूर तालुक्याच्या बेट भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून शेतकरी संकटात सापडला आहे. दिवसा शेतीसाठी विज देण्याची मागणी शेतकरी करू लागल्याने जनतेची ही गऱ्हाणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्न विचारून सरकारचे लक्ष याकडे वेधून घ्यावे. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कडे केली आहे.
रांजणगाव औद्योगीक वसाहतीमधून पाणी व हवेचे प्रदुषण होऊन परिसरातील नागरिकांवर त्याचा परिणाम आरोग्यावर झाला आहे. अनेक वेळा या ठिकाणी उपोषण करून देखील अधिकारी या बाबत ठोस निर्णय घेत नाही. त्याचा परिणाम भयावह झाला असून शेतजमिनी नापीक झाल्या आहेत.
जनतेचा आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या भागातील जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उदभवला असून या बाबत कोणीही विचारणा देखील करत नाही. तरूणांनी या भागात उपोषण केले तर त्यांचे उपोषण व्यर्थ ठरू पहात आहे. या भागातील स्थानिक नागरिकांना न्याय मिळावा.
अधिकचे वाढीव क्षेत्र सरकारने कंपनीना देऊ नये. या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसे निवेदन देखील देण्यात आल्याचे पाचुंदकर यांनी सांगितले. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याने वाडीवस्तीवर धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याने माणासांना जीव गमवावा लागला आहे.
नरबळी ठरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करणे वनविभागाचे काम आहे. मात्र बिबट्याचे दर्शन व पाळीव प्राण्यांवरील हल्ले थांबत नाही. त्यामुळे शेतकरी, मजूर, प्रवासी यांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या संदर्भात सरकारचे लक्ष वेधावे. दिवसा शेतीसाठी विज द्यावी. या बाबत देखील निवेदन देण्यात आले आहे.
रांजणगाव औद्योगीक वसाहतीमधील प्रदुषण व शुद्ध पाण्याबाबत लवकरच संबधीत अधिकाऱ्यांची बैठक बोलावली जाईल. बिबट्यांची संख्या वाढली असून ती नियंत्रणात कशी आणता येईल. यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात येईल. असे टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात वळसे पाटील यांनी सांगितले.