पुणे : आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्यात घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु केली आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या देखील वाढत आहे. अशातच आता मंगळवारी मोदी बागेत सकाळी एका मोठ्या व्यक्तींनी शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, ही मोठी व्यक्ती कोण? त्याची चर्चा रंगली आहे. मोदी बागेतून सुप्रिया सुळे यांच्या गाडीत जाताना त्या व्यक्तीने आपला चेहरा फाईलने लपवला होता. याबाबत अनेक तर्क वितर्क सुरु होते. अशातच आता फाईलने तोंड लपवलेला हा नेता माजी मंत्री राजेंद्र शिंगणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी फाईल लपवणारी ती व्यक्ती राजेंद्र शिंगणे असल्याचा दावा केला आहे. राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत गेले होते. मात्र, राजेंद्र शिंगणे पुन्हा एकदा घरवापसी करत शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत असं बोललं जात आहे. नुकतीच शिंगणे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत देखील दिली आहे.
कारमध्ये फाईलआड तोंड लपवून शरद पवारांच्या भेटीला पोहचलेला नेता कोण? #SharadPawar #NCPSP #Pawar #supriyaSule pic.twitter.com/ilJi5u4iPa
— Yogesh Kangude (@Yogesh_Kangude) October 9, 2024
दरम्यान, काही दिवसांपुर्वी वर्ध्यामध्ये बोलताना आमदार राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत का गेलो? याचं कारण सांगितलं होतं. मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे आणि नाइलाजाने मी अजित दादांसोबत गेलो. आज राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारने तीनशे कोटी दिले आहेत. मात्र, निश्चितपणे आदरणीय शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहील, अशी कबुली आमदार राजेंद्र शिंगणे यांनी दिली होती, आता पुन्हा ते शरद पवारांसोबत येतील अशी चर्चा सुरु झाली आहे.