पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरातील गुंड निलेश घायवळ याचा फोटो मुख्यमंत्र्यांसोबत दिसल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हा फोटो ट्वीट केला आहे. या निमित्ताने निलेश घायवळ नेमका कोण आहे, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
कोण आहे निलेश घायवळ?
निलेश बन्सीलाल घायवळ हा पुण्याच्या कोथरुड भागातील गुंड आहे. त्याच्यावर एकूण २३ ते २४ गुन्हे दाखल आहेत. निलेश घायवळ एकेकाळी गजानन मारणे याचा जवळचा मित्र आणि विश्वासू साथीदार मानला जात होता. मारणे टोळीची दहशत कोथरुडसह पुणे शहर, मुळशी तालुक्यात वाढली. त्यानंतर मारणे आणि घायवळ याने अनेक तरुणांना टोळीमध्ये सामील करून घेतले. यापूर्वी गुंड गजानन मारणे आणि निलेश घायवळ या दोन टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून टोळीयुद्ध भडकले होते. घायवळ याच्याविरूद्ध खून, खूनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी, दुखापत, बेकायदा शस्त्र बाळगणे, खंडणीसाठी अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
काय आहे घायवळ गँगची पार्श्वभूमी ?
कुख्या गुंड निलेश घायवळ आणि गजानन मारणे यांच्या टोळीच्या वर्चस्ववादातून शहर आणि जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या दोघांत वाद झाल्यानंतर दोन स्वतंत्र गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या आहेत. मारणे याच्या टोळीने सन २००९ मध्ये निलेश घायवळचा खूनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दोन्ही टोळीचे वाद आणखी टोकाला गेले आहेत. कोथरूड पोलिसांनी सन २०१७ मध्ये कुख्यात गुंड घायवळ याच्याविरूद्ध मोकानुसार कारवाई केली होती. त्यानंतर २०२० मध्ये तो कारागृहातून सुटून बाहेर आला होता. त्यानंतर पुन्हा कोथरुड पोलिसांनी त्याच्यावर दोन वर्षे हद्दपारीची कारवाई केली. त्यामुळे घायवळ शहरातून बाहेर गेला होता.
गुन्हेगारी कारवाया सुरूच…
पुण्यात असताना घायवळ टोळीने उच्छाद मांडलेलाच होता. पण पोलिसांनी तडीपार केल्यानंतरही निलेश घायवळ याने भिगवण पोलीस ठाण्यातंर्गत एका रेल्वे ठेकेदाराकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. या ठेकेदाराने त्याने अपहरण केले होते. मात्र त्यामुळे त्याची गुन्हेगारी थांबलेली नसल्याचे दिसून आले होते.
घायवळ-मारणे टोळीयुद्धाचे परिणाम…
मुळशी तालुक्यातील जमीन व्यवहारात मारणे टोळीने शिरकाव केला. जमीन व्यवहारातून करोडो रुपयांची दलाली, तसेच खंडणी मिळाल्याने टोळीचा विस्तार झाला. घायवळ आणि मारणेला मानणारे तरुण टोळीत होते. वर्चस्व, आर्थिक व्यवहारातून दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू होता. अखेर दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. मारणे टोळीत उभी फूट पडली आणि घायवळने स्वत:ची टोळी सुरू केली. खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या घायवळने टोळीचे वर्चस्व वाढविण्यास सुरुवात केली. त्यातून मारणे आणि घायवळ टोळीतील सराइतांनी भरदिवसा हल्ले सुरू केले. टोळीयुद्धातून तिघांचे खून झाले. घायवळ आणि मारणे टोळीविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली. दोन्ही टोळ्यांमधील संघर्ष शमविण्यासाठी भारतीय जनता पक्षातील एका नेत्याने प्रयत्न केले. त्यानंतर घायवळ आणि मारणे टोळीतील संघर्ष शमला