पुणे : पुण्यात पीएमपी बसचालकाला पोलिसाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे पीएमपी चालकांनी संताप व्यक्त करत पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर पीएमपी चालकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत मारहाणीची तक्रार केली.
त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी बसचालकाला आणि मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला सांगितले की, पोलीस तक्रार केली तर दोघांनाही त्रास होईल, असे समजावून सांगितले. दरम्यान, फौजदारी कारवाई होईल, या भीतीने पोलीस कर्मचाऱ्याने माफी मागितली. तसेच चालकानेदेखील पोलिसांचा कोणत्याही प्रकारचा ससेमिरा मागे लागू नये, म्हणून रितसर पोलीस तक्रार केली नसून दोघांनाही पोलिसांनी सोडून दिले.
दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्याकडून लेखी लिहून घेतल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधोत कोणतीही तक्रार दिली नसल्याने या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला असून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या चालकाने पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध आपली कोणतीही तक्रार नसल्याचे पत्र देखील दिले आहे. मात्र, या घटनेनंतर पोलीसांनी मध्यस्थी करून आपापसातले भांडण मिटवत चालकाला नुकसान भरपाई दिली खरी पण अब्रू चव्हाट्यावर अली याच करायचं काय? असा प्रश उपस्थित केला जात आहे.
नेमकं पत्रात काय म्हटलंय?
पोलीस आर. ए. वाघमारे म्हणाले की, आज माझी व पीएमटी चालक PMT क्र. MH12 F2 8243 यांच्याशी माझे किरकोळ वाद झाले. सदर इसम पीएमटी चालक भागवत तोरणे व मी स्वत: पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलो, असता त्या ठिकाणी आमच्यात सदर तक्रारीबाबत आपापसात समजुतीने वाद मिटला आहे. तरी सदर व्यक्तीबाबत माझी कोणतीही तक्रार नाही, त्यांच्या पीएमपीचे नुकसान झाले असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार मी त्यांचे तीन हजार रुपये रोखीने भरले आहेत.
नेमकं काय घडलं?
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका पोलिस कर्मचाऱ्याने डोक्यात हेल्मेट घातलेलं दिसत आहे. पोलीस पीएमपी ड्रायव्हरला मारहाण करत आहे. यावेळी पीएमपी चालक जोर जोराने ओरडत असून मला का मारतो? अडचण काय, तु मला मारु नको, तुला काय झालयं, मी तुला शिवीगाळ केली आहे का. तुझा प्रॉब्लेम काय, तुला मारलं का मी, शिवीगाळ केली का… माझी गाडी सरळ आहे. असं बोलत आहे. मात्र, पोलीस त्या पीएमपी चालकाचे गचुर धरून मारहाण करत आहे.
या घटनेचा व्हिडिओ दोन पीएमपी वाहक आणि चालकांनी मोबाईल कॅमेरात कैद केला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांच्या जिवाचा थरकाप उडाला. मात्र, या प्रकरणात सदर पोलीस शिपायाकडून तीन हजार रुपये चालकाला देऊन ही तक्रार आपापसात मिटवली असल्याचे पत्र पोलीसांनी लिहून घेतले आहे. दरम्यान, या पोलीस शिपायाची भरपाई कोण देणार, अशी चर्चा नागरिक करत आहेत.