पुणे : राज्यात शांतता राहिली पाहिजे. यासाठी सर्वांनी पुढे येऊन काम करणे गरजेचे आहे. राज्यात सद्य:स्थितीला मुली, महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गुंडागर्दी वाढली असून रस्त्यावर मुलींना मारले जात आहे. तर पुण्यात कोयता गँगने धुडगूस घातला आहे. त्यावर पोलीस आयुक्तांचा वचक राहिला नाही. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे, अशा शब्दात रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला.
पुण्यातील शिवाजीनगर भागातील साखर संकुल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट नियामक मंडळाची आज बैठक पार पडली. त्या बैठकीला मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे, रोहित पवार, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी देखील उपस्थित होते. त्या बैठकीनंतर रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
पुढे बोलताना म्हणाले, पुणे शहर आणि जिल्ह्याकडे पालकमंत्री (अजित पवार) यांचे लक्ष नसल्याचे सांगत अजित पवार यांचे नाव न घेता रोहित पवार यांनी टीका केली. राज्यातील शेतकरी वर्गापासून सर्व सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्या सर्व गोष्टींना महायुती सरकार जबाबदार आहे. त्या विरोधात आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविणार आहे असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.