युनूस तांबोळी
शिरूर, (पुणे) : शिरूर तहसिल कार्यालय हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांना सेवा ऐवजी भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे व्यवहार होत असल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
एका बाजूला पुरवठा विभाग तर दुसऱ्या बाजूला सेतू कार्यालय विभाग यामध्ये दररोज चालणारे चिरमीरीचे व्यवहार याला नागरिक कंटाळले आहे. त्यातच दीड महिन्यापुर्वी शिरूर तहसील कार्यालयाचा पदभार प्रभारी तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या हाती सोपविण्यात आला आहे. असे असतानाही प्रलंबित कामे मार्गी लागत नसल्याने आता सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी. असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.
शिरूर तहसिल कार्यालयातील खात्यांमध्ये वेगवेगळा कारभार सुरू आहे. पुरवठा विभागात नागरिकांची नेहमीच झुंबड उडत असते. या ठिकाणी नव्याने शिधापत्रीका काढल्यावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नव्याने लग्न झालेल्या जोडप्याला जर विभक्त व्हायचे असेल किंवा कौंटोबिक कारणाने हे कुटूंब विभक्त झाले असेल तर त्यांना शिधापत्रीका मिळत नाही. मिळालीच कोणाला शिधापत्रीका तर त्याला धान्य मिळण्याची सुविधा नसते. नियमाप्रमाणे शिधापत्रीका ही महिणन्यात द्यावी, असे असताना शासकिय नियमांना तिलांजली देत असल्याचे चित्र आहे.
नवीन कार्डला आधार कार्ड लिंक करून देण्यासाठी कागदपत्रे देऊनही अनेक महिने वाट पहावी लागत आहे. चुकीच्या व्यक्तींची नावे कमी करणे, अथवा धान्य न देणे, यासाठी शिधापत्रीकेत बदल करणे असे प्रकार घडून येत आहे. त्यातून चिरमीरीचे दिलीच तर त्वरीत काम पुर्ण होत असल्याच्या हलक्याशा तक्रारी नागरिकांमधून होऊ लागल्या आहेत.
सर्वसामान्याचे सर्व दाखले मिळण्याचे सेतू कार्यालय हे एकमेव ठिकाण म्हणजे सेतू होय. या ठिकाणि देखील शाळा, कॅालेज चे विद्यार्थी तसेच सर्व सामान्य नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतात. अशा ठिकाणि वेळेत दाखले मिळणे अपेक्षित असते. मात्र कागदपत्रे देऊन देखील वेळेत दाखले मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. त्यामुळे नव्याने पदभार स्विकारलेले प्रभारी तहसिलदार यांनी या परिसरातील पाहाणी करून त्यांचे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. असे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, तत्कालीन तहसिलदार लैला शेख यांच्या बदलीनंतर आत्ता पर्यत तीन तहसिलदार प्रभारी म्हणून आले. पण येथे वरीष्ट कार्यालयातून प्रभारी ऐवजी कायमस्वरुपी तहसिलदार का दिला जात नाही. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजकिय नेत्यांनी टेकले हात…
शिरूर तहसील कार्यालय हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कधी अवैध वाळूच्या तक्रारी तर कधी अवैध मरूम उपसा यामुळे आर्थीक हित जोपासणारे अधिकारी बदली होऊन गेले. पण शिरूर तहसील म्हणजे ‘सोने की चिडीया’ असेच वातावरण करून गेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणारे अधिकारी या पदाला ‘परीस स्पर्श’ असे संबोधतात. योग्य अधिकारी या ठिकाणी यावा यासाठी येथील राजकीय नेते उपोषणाला बसणार होते.
मात्र नव्याने आलेले प्रभारी तहसिलदार यांच्या कार्यकुशलतेला पाहून राजकीय मंडळी गप्प का बसले असावेत. या पदाला हक्काचा तहसिलदार मिळणार का? असाही सवाल नागरिक करू लागले आहेत. भ्रष्ट कर्मचारी व कारभाराला वठणीवर आणण्यासाठी नव्याने कुठली चाल संबधीत अधिकारी लावणार की ‘मागचे पाढे पाठ पुढचे सपाट’ असचे कारभाराचे गणित राहणार का ? असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत.