पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मेळावे, बैठका, सभा यासह विविध घडामोडींना वेग आला असल्याचे सद्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत आलेली निराशा पुन्हा येऊ नये यासाठी भाजपसह मित्रपक्षांनी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुकांयला सुरूवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते पुण्यात बैठक घेणार आहेत. या बैठकीआधी काल(शनिवारी) रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शाहांसोबत बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.
अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अधिवेशनाआधी बैठक झाली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमित शाहांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला असण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा झाली असण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेले काही दिवस झाले मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा चांगल्याच रंगल्या असल्याचे बघायला मिळत आहे. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना लवकरच राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार होईल असं म्हटलं होतं. या अनुषंगाने फडणवीस आणि शाह यांच्यात याबाबतची चर्चा झाली असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
भाजपची चिंतन बैठक
गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यात भाजपच्या वाट्याला ही कमी यश आलं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपाला सार अपयश बाजूला सारायच आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील बालेवाडी परिसरात असलेल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपची चिंतन बैठक पार पडणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने अमित शाह हे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच भाजप हे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग पुण्यातूनच फुंकणार असल्याची चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी तयारी सुरू
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसह महायुतीला राज्यासह देशाही मोठा फटका बसला. याच पार्श्वभूमीवर भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आज पुण्यात भाजपचे चिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशनही आज पुण्यात पार पडणार आहे. या बैठकीला राज्यभरातील सर्व भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते असे जवळपास 5 हजार 300 पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादी नेते उपस्थित राहणार आहेत.