गणेश सुळ
केडगाव : आता गेल्या काही दिवसांत रेल्वेसंबंधी कामे मार्गी लागत आहेत. दौंड रेल्वे जंक्शनला पुणे विभागात सामाविष्ट करण्यासाठी रेल्वे बोर्डाने २१ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली. पुणे-दौंड दरम्यान तिकिट दर देखील कमी झाले; मात्र, पुणे ते दौंड दरम्यान सुमारे ५० वर्षांपासून उपनगरीय लोकलची मागणी केली जात आहे. ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. २०१७ साली पुणे ते दौंड दरम्यान विद्युतीकरण पुर्ण झाले; परंतु या मार्गावर डेमू/मेमू शटलमधूनच प्रवास करावा लागत आहे. या गाड्यांची वारंवारता खूपच कमी आहे.
अनेक वेळा रेल्वे प्रशासनाला जाब विचारला असता, त्यांच्याकडून सांगण्यात येते की याबाबतचा प्रस्ताव बोर्डाकडे पाठवला आहे; मंजुरी आणि अधिसूचना मिळाल्यावर लोकल सुरू करु. मात्र, अद्याप कार्यवाही झाली नाही. स्थानिक रेल्वे प्रवासी, आमदार, खासदार, संघटना, सल्लागार समिती सदस्य यांनी सर्वांनी याबाबत मागणी केली आहे. मध्य रेल्वे मुख्यालयाने रेल्वे बोर्डाकडे पुणे-दौंडला उपनगरीय विभाग घोषित करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे; परंतु अजूनही याला मंजुरी मिळाली नाही. यासाठी प्रवाशांना या वेळेस तरी पुणे-दौंड उपनगरीय लोकल सेवेचा लाभ मिळेल का, असा सूर आळवण्यात येत आहे.
बारामती लोकसभेचे खासदार सुप्रिया सुळे, दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार ॲड. राहूल कुल, माजी आमदार रमेश थोरात तसेच प्रवासी संघटनांनी वेळोवेळी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना भेटून, पत्रव्यवहार करून, सातत्याने पाठपुरावा करून देखील केंद्रीय रेल्वेमंत्री याबाबत अधिसूचना का काढत नाहीत, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
पुणे ते दौंड दरम्यान सुमारे ५० हजार प्रवाशी रोज प्रवास करतात. पण उपनगरीय लोकल सेवेअभावी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दौंड आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिक पुणे येथे प्रवास करतात. यासाठी आता तरी रेल्वे बोर्डाने पुणे ते दौंड दरम्यान उपनगरीय लोकल सेवेसाठी अधिसूचना देऊन मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे.