पुणे : पुणे शहरासह उपनगरात गणेशोत्सव उत्साहात नुकताच साजरा झाला आहे. विसर्जन मिरवणुकीत बंदी असताना देखील डीजे वापर मोठ्या प्रमाणावर झाला. याचे दुष्परिणाम आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. कात्रज येथील शूर शिवबा मित्रमंडळाच्या कार्यकर्त्याला ऐकू येणे बंद झाले. तत्काळ वैद्यकीय उपचाराने एका कानाने थोडे ऐकू येऊ लागले. पण दुसऱ्या कानाने ऐकू येणे बंद झाले. सागर मोरे (32 वर्ष) असं तरुणाचे नाव आहे.
उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्या शुर शिवबा गणेश मंडळाचा सागर हा कार्यकर्ता आहे. वसंत मोरे यांनीही सागर याची भेट घेतली. शिवाय या पुढे कधी गणेश विसर्जनात डीजे न लावण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. सागर मोरेला दोन मुली आहेत. छोटी-मोठी बांधकाम कंत्राटी घेऊन तो त्याचं घर चालवतो.
मात्र आता दोन्ही कान निकामी झाल्याने, सागरला भविष्याची चिंता सतावत आहे. सागरचा एक कान 95 टक्के तर दुसरा कान 85 टक्के निकामी झाला आहे. सागर मोरे याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्याला आता घरी सोडण्यात आले आहे. गणेश विसर्जनावेळी कात्रज चौकामध्ये चार गणेश मंडळांच्या डीजेच्या दणदणाटेमुळेच सागरचे दोन्ही कान निकामी झाले आहेत .
मी दोनवेळा सर्वांना खाली उतरविण्याचा प्रयत्न केला : वसंत मोरे
याबाबत बोलताना वसंत मोरे म्हणाले की, सागर मोरे हे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी चार तास डीजेच्या ट्रॅक्टरवर उभे होते. मी स्वतः कमीत कमी दोनवेळा सर्वांना खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. नंतर मिरवणूक कात्रज बसस्टॉपसमोर आली त्या ठिकाणी चार मंडळांचे साउंड एकत्र वाजू लागले. त्यानंतर एक तासाने मिरवणूक कात्रज तलावावर थांबली. तेव्हा सागर यांना ऐकू येणे बंद झाले.
त्त्वरित मिळालेल्या उपचारामुळे सागर यांना एक कानाने ७० टक्के ऐकू येत आहे. मात्र, दुसऱ्या कानाने ऐकू येणे बंद झाले आहे. आमच्या मंडळाने पुढील वर्षापासून डीजे पूर्णपणे बंद करून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेतून इतर मंडळांनीही बोध घेणे गरजेचे असल्याचेही मोरे यांनी सांगितले.