बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर सत्तासमीकरणे बदललीच, त्याचबरोबर पवार कुटुंबातील व्यक्तींचीही नाराजी त्यांनी ओढवून घेतली आहे. आतातर अजितदादांचा सख्खा भाऊच त्यांच्या विरोधात गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून मालकालाच घराबाहेर काढायचे का? आज ज्यांना कुणाला काही पदे मिळाली ती साहेबांमुळेच मिळाली आहेत. आता साहेबांना म्हणायचे कीर्तन करा, घरी बसा हे काय मला पटलं नाही. भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं, पण आता नाही असे म्हणत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे.
काटेवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार यांनी संवाद साधतांना त्यांनी अजित पवारांचा निर्णय पटला नसल्याचे बोलून दाखवले. श्रीनिवास पवार म्हणाले की, मी दादांच्या विरोधात गेल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटते. कारण आजपर्यंत मी दादाला नेहमीच साथ देत आहे. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी उडी मी मारली. आमदारकीला दादा आहे, तर खासदारकी साहेबांनाच दिली पाहिजे, या मताचा मी आहे. कारण साहेबांचे आमच्यावर उपकार आहेत, हे सगळ्यांना माहित आहे. त्यांना आदर दिला पाहिजे. वडिलधाऱ्यांचा आदर करणे, ही आपली संस्कृती आहे. मला आता कोणाच्या दबावाखाली जगायचे नाही. जगायचे तर स्वाभिमानाने. लाभार्थ्यांच्या मागे जायचे मला पटत नाही, असे श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केले. शाळेतील मित्र मला न सांगता गेले असा टोला देखील त्यांनी भरणेंना लगावला.
श्रीनिवास पवार पुढे म्हणाले की, माझे मित्र मला म्हणतात, इथून पुढे दादांची वर्षे आहेत, साहेबांचे काही चालणार नाही. हा विचारच वेदनादायी आहे. वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करीत नाही. कारण आपल्याला पुढची दहा वर्षे दुसऱ्याकडून लाभ मिळणार आहे, याच्यासारखा नालायक माणूस नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केले. २५ वर्षे मंत्री केले. असा काका सर्वांना मिळाला पाहिजे. पक्ष संपवायची चाल चाल भाजपची आहे. भाजपला शरद पवार संपवायचे होते. म्हणून ते ही चाल खेळले. घरातली व्यक्ती फुटली तर आपण घर फोडू शकतो. हीच रणनिती भाजपने आखली आहे.
वयस्कर माणसाला कोणीही कमजोर समजू नये, असे म्हणत क्षीनिवास पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. साहेब आजपर्यंत कधीच कुणावर आवाज चढवून बोलले नाहीत, २०-२५ वेर्ष साहेबांनी राज्य सोपवले आणि ते दिल्लीत होते. मी माझा कारखाना मुलाकडे सोपवला आहे. मी जर २० वर्षांनी तिकडे गेलो तर वॉचमनच मला आत सोडत नाही. आपण मरेपर्यंत आई-वडिलांना सांभाळतो, औषध पाणी करतो, असेही श्रीनिवास पवार म्हणाले. त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली.