पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैत्रीण असलेल्या तरुणीला रस्त्यात अडवून ‘दुसऱ्यासोबत फिरण्यास जाण्याचा तुझा संबंध काय आहे?’ अशी विचारणा करून तिला गंभीर मारहाण करून तिचा जबडा फॅक्चर केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार ९ नोव्हेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास शहरातील शिवाजीनगरमधील मॉडल कॉलनीत घडला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी रोहन जगन्नाथ कदम (वय २७, रा. भैरवनाथ तालीम चौक, गणपती मंदिराच्या गल्लीत, कोंढवा खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वानवडीत राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमक काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी रोहन कदम हे मित्र-मैत्रीण आहेत. दिवाळीपासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. दरम्यान, 9 नोव्हेंबर रोजी दुपारी दुपारी बाराच्या सुमारास तरुणी ही तिच्या मित्रासोबत त्याच्या दुचाकीवर जात होते. ते आरोपी रोहनने पाहिले होते.
त्यानंतर त्याने रागाच्या भरात तिचा रस्ता अडवून तिला जबर मारहाण केली. त्याचबरोबर, त्याने तिच्या तोंडावर बुक्यांनी गंभीर मारहाण केली. या मारहाणीत तरूणीचा जबडा फ्रॅक्चर झाला. या घटनेनंतर तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.