मुंबई : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघ या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचा ठरत आहे. शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवार ठरवण्यासाठी सध्या महायुतीच्या गोटात जोरदार खलबतं सुरु आहेत. ही प्रक्रिया सुरु असतानाच वर्षा बंगल्यावर शिरूरचा उमेदवार ठरवण्यासाठी मंगळवारी रात्री एक बैठक पार पडली. या मतदारसंघातून या बैठकीत इच्छुक उमेदवार असलेल्या आढळराव पाटलांना बाहेर ताटकळत ठेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बंद दाराआड चर्चा झाली. या प्रकारानंतर शिवाजीराव आढळराव पाटील वर्षा बंगल्यावरुन आपल्या सहकाऱ्यांसह बाहेर पडले. घडलेल्या प्रकारामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे.
शिरुर लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी वर्षा बंगल्यावर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह जुन्नर तालुक्यातील नेतेमंडळी उपस्थित होती. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले शिवाजीराव आढळराव पाटील शिरुरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही शिरुर मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शिरुर कोणाच्या वाट्याला येणार, याची उत्सुकता आहे. या पार्श्वबूमीवर एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आणि इतर मतदार संघातील नेतेमंडळी देखील उपस्थित होती.
या बैठकीप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटील आणि इतर नेत्यांना बाहेर ठेवून बंद दाराआड दिलीप वळसे-पाटील आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केली. या प्रकारानंतर शिवाजीराव आढळराव पाटील वर्षा बंगल्यावरुन आपल्या सहकाऱ्यांसह बाहेर पडले. घडलेल्या प्रकारामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, शिरुर मतदारसंघावर अजित पवारांनी दावा केला आहे. राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे हे खासदार असून, ते शरद पवार गटाकडून निवडणूक लढवतील. तर अजित पवार गटाकडून अद्याप उमेदवार ठरला नाही. याच ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून आढळराव पाटील इच्छुक आहेत. मात्र, शिरूर मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे राखण्यासाठी महायुतीने चंग बांधला आहे. त्यामुळेच या मतदारसंघावर दावा करणाऱ्या शिंदे गटाच्या आढळरावांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन शांत बसवण्यात आल्याची चर्चा आहे. पुणे म्हाडाचे अध्यक्षपदे हे राज्यमंत्र्यांच्या दर्जाचे आहे. त्यामुळेच आढळरावांचा पत्ता कट केल्याचीही चर्चा सुरू आहे.
म्हाडाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर शिरूर मतदारसंघावर दावा करणाऱ्या आढळरावांची भाषा काहीशी नरमाईची झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याच्या मागे आपण ठाम राहू, त्याचा प्रचार करू अशी भूमिका आढळरावांनी घेतली आहे. असे असले तरीही आढळरावांनी अद्याप आपल्या उमेदवारीची आशा सोडली नाही. कारण या मतदारसंघावर दावा केलेल्या अजित पवार कुणाला उमेदवारी देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दुसरीकडे नाराज अजित पवारांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना पाडण्याचा चंगच बांधला आहे. अमोल कोल्हे यांच्यासाठी आपण गेल्या निवडणुकीमध्ये जीवाचे रान केले, आता या निवडणुकीत त्यांना पाडणार म्हणजे पाडणार अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे. आता अजित पवारांच्या या निश्चयाचा फायदा आढळरावांना मिळणार की आणखी कुणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आढळरावांनी अद्याप आपल्या उमेदवारीची आशा सोडली नसल्याचे दिसून येत आहे.
‘शिरुर’वर वर्षा बंगल्यावर खलबतं, आढळराव पाटलांना ताटकळत ठेवून मुख्यमंत्र्यांची अजित पवारांसोबत बंद दाराआड चर्चा