पुणे : मित्राने जेवायला न दिल्याने, दुसऱ्या मित्राच्या कानाचा चावा घेऊन कानच तोंडल्याची धक्कादायक घटना मार्केटयार्ड परिसरात शुक्रवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. या प्रकरणात मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत कांबळे (वय. ३५, रा. कात्रज) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, सचिन कुंभार (वय. ३९, कात्रज)असे फिर्याद दिलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन कुंभार आणि आरोपी अनिकेत कांबळे मित्र असून कात्रज भागात एकत्र वास्तव्यास आहेत. फिर्यादी सचिन कुंभार शुक्रवारी (ता.२७) त्याच्या मैत्रिणी सोबत मार्केट यार्ड येथे असलेल्या फुल मार्केटच्या पार्किंगमध्ये बोलत होते.
दरम्यान, आरोपी अनिकेत कांबळे तिथे आला आणि त्याने सचिनला मला खायला दे किंवा जेवायला चल अशी विचारणा केली. यावर सचिनने नकार दिल्यानंतर अनिकेतला राग अनावर झाला आणि त्याने शिवीगाळ केली. या वादाचे रूपांतर नंतर भांडणात झाले आणि अनिकेतने सचिनला धरत त्याच्या कानाला जोरात चावा घेतला. त्याने इतका जोरात चावा घेतला की, सचिनच्या कानाची पाकळी तुटून पडली आणि यात सचिन गंभीर जखमी झाला.
याप्रकणी सचिनने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद. त्यानुसार आरोपी अनिकेत कांबळे याच्यावर भारतीय दंडात्मक कलम ३२५, २९४, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.