पुणे : राज्यभेसाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. परंतु सुनेत्रा पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात नाराजी नाटय सुरु असल्याची माहीती समोर अली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तुमची निवड बिनविरोध आहे? या प्रश्नावर सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ’18 तारीख शेवटची आहे, तो पर्यंत वाट बघावी लागेल’ “पक्षाने मला राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार तसेच पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सगळ्याचेचं मी मनापासून आभार मानते. एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने दाखवलाय. त्या संधीच सोन करण्याचा प्रयत्न करेन” असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून राज्य सभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. याआधी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. सुनेत्रा पवार आता राज्यसभेवर जाणार आहेत. तुम्हाला उमेदवारी मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, “अशी नाराजी कुठे दिसली नाही, भुजबळ फॉर्म भरतातना उपस्थित होते. त्यांनी शुभेच्छा दिल्या. नक्कीच कोणती नाराजी नाही” सुरुवातीला अजित पवार तुम्हाला उमेदवारी द्यायला तयार नव्हते का? या प्रश्नावरही सुनेत्रा पवार यांनी उत्तर दिलं. “खरतर मला उमेदवारी द्यावी ही पक्षातून आणि जनतेतून मागणी होत होती. आग्रह धरु नये म्हणून मी कार्यकर्त्यांना विनंती केली. लोकसभेच्या उमेदवारीवेळी सुद्धा जनतेतून मागणी करण्यात आली होती”
छगन भुजबळ नाराज
राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार याना मिळालेल्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षात केवळ सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल पटेल हेच निर्णय घेत असून इतरांशी निर्णय प्रक्रियेबाबत बोललं जात नसल्यानं छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऐनवेळी उमेदवार घोषित केला जात असेल, तर याचा अर्थ उमेदवार आधीच निश्चित करण्यात आला आहे, मग उगाचच उमेदवारीसाठी वेळ का घालवण्यात आला? असा प्रश्नही छगन भुजबळांनी अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना विचारला आहे. लोकसभेच्या पराभूत उमेदवाराला बॅक डोअर एन्ट्री का दिली जातेय असा प्रश्नही छगन भुजबळांकडून उपस्थित करण्यात आला होता.