युनूस तांबोळी
शिरूर : कवठे येमाई (ता. शिरूर) येथे वारंवार रोहित्र चोरीच्या घटना घडत आहेत. या प्रकरणी पोलीस तपास होत नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत पाणी असूनही रोहित्र चोरीला गेल्याने चार दिवस नळ योजनेतून पाणी येत नसल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
फत्तेश्वर बंधाऱ्यावरील गावाला पाणीपुरवठा करणारे व अन्य एक अशी दोन रोहित्रे फोडून त्यातील तांब्याच्या महागड्या कॉइल काढून नेल्याची घटना मंगळवारी (ता. २७) पहाटेच्या सुमारास घडली आहे. रोहित्रांच्या चोरीमुळे गावाला तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतातील विहिरींना पाणीसाठा कमी आहे. गावाला बंधाऱ्यावरून पाणीपुरवठा करणारी यंत्रणा आहे. परंतु या चोरीच्या घटनेमुळे पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहे.
शेतकऱ्यांच्या रोहित्रांची चोरी झाल्याने शेतीचा पाणीपुरवठा देखील बंद झाला आहे. आधीच पिकवलेल्या शेतमालाला बाजारभाव नाही. त्यात अशा समस्यांना सामोरे जात असताना रोहित्र चोरीच्या घटना वाढत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये व गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एकूणच बेट भागात विद्युत रोहित्र, केबल, विद्युत मोटार चोरण्याचे सत्र चोरट्यांनी अवलंबले आहे. शिरूर पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे. विद्युत रोहित्र चोरीला जाऊ नये, यासाठी महावितरण विभागाच्या वतीने रोहित्र वेल्डिंग करण्यात येते. परंतु चोरटे वेल्डिंग तोडून रोहित्र चोरून नेत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
शिरूर पोलीस प्रशासनाशी चर्चा करणार
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात रोहित्र चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. रोहित्र चोरीमुळे गावाला दोन ते चार दिवस पाणी येणार नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने पोलीस यंत्रणेने अशा चोरीच्या घटनांचा लवकर तपास लावावा. याबाबत शिरूर पोलीस प्रशासनाशी लवकर चर्चा करणार आहे.
– डॉ. सुभाष पोकळे, पंचायत समिती सदस्य
पीक वाया जाण्याची भिती
माझी तीन एकरमध्ये कलिंगड शेती आहे. यासाठी सुमारे ३ लाखांचा खर्च झाला आहे. हे पीक वाया जाण्याची भिती आहे. रोहित्र चोरीमुळे शेतीला पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे.
– संतोष जमादार घोडे, शेतकरी