शिरुर : शिरुर शहरातील एका सराफाच्या दुकानात गावठी पिस्तुलातून गोळीबार करीत दहशत माजवणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेत एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक कृत्ये कायद्याअंतर्गत सदर कारवाई करण्यात आली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर शहरातील एका सराफाच्या दुकानात गोळीबार करीत दहशत माजवणाऱ्या शरद बन्सी मल्लाव (वय २५ रा. काची आळी, शिरुर जि. पुणे) यांच्यावर पोलिसांनी एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. मल्लाव हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात सात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
पुणे जिल्ह्यातून यापूर्वी त्याला दोनदा हद्दपार करण्यात आले होते. परंतु, अद्यापही त्याच्या वागण्यात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत अकोला येथील मध्यवर्ती कारागृहात पाठवलेले आहे. २०२५ सालातील ही पहिलीच धडाकेबाज कारवाई आहे. २०२४ मध्ये शहरातील चार गुंडांवर तडीपारीची कारवाई, करण्यात आली होती.
या कारवाईत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, उप पोलीस निरीक्षक शुभम चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार महेश बनकर, पोलीस हवालदार मंगेश थिगळे, परशराम सांगळे, नाथसाहेब जगताप, नितेश थोरात, अजय पाटील, विजय शिंदे, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, निरज पिसाळ यांनी सहभाग घेतला आहे.