विशाल कदम
लोणी काळभोर : बाळू मामांच्या नावाने चांगभले…!! या जयघोषात व संत बाळूमामांच्या पालखीवर भंडाऱ्याची जोरदार उधळण करून लोणी काळभोर (ता. हवेली) नगरीत पालखीचे मंगळवारी (ता.२४) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
संत बाळूमामांचा पालखी सोहळा हा लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत सहा वाजण्याच्या सुमारास पोहचला. तेव्हा पालखी सोहळ्याचे स्वागत हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर, लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर व उपसरपंच भारती काळभोर यांनी स्वागत केले. यावेळी लोणी काळभोरचे ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, ज्योती काळभोर, सविता लांडगे, सागर काळभोर, सचिन काळभोर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदमापूर येथील संत बाळूमामा संस्थानच्या संत बाळूमामांच्या पालखीचे आणि त्याबरोबर असणार्या मेंढ्यांचे मंगळवारी (ता.२४) आगमन झाले. त्यानिमित्त परिसरातील भाविकांनी आणि नागरिकांनी पालखी दर्शनाला मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या. लोणी काळभोर गावामध्ये संत बाळूमामांच्या पालखीची व पादुकांची मिरवणूक काढून काढण्यात आली. या गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. महिलांनी रस्त्यावर रांगोळ्या काढून, फुलांचा सडा टाकून आणि जागोजागी पालखीचे औक्षण करून स्वागत केले.
दरम्यान, संत बाळूमामा पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यसाठी कदमवाकवस्ती, मांजरी, थेऊर व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी भक्तांनी पालखीची अभिषेक घालून पूजा केली. लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा मंदिरात पालखी सोहळा संध्याकाळी मुक्कासाठी विसावला. या ठिकाणी संत बाळूमामा यांच्या पादुकांचे पूजन महंत हेमंतपुरी महाराज १००८ यांच्याहस्ते करून आरती करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थित भाविक-भक्तांना अन्नप्रसादाचे वाटप करण्यात आले. संत बाळूमामा यांच्या पालखीचा लोणी काळभोर गावामध्ये चार दिवस मुक्काम राहणार असणार आहे. त्यानंतर पालखी सोहळा आळंदी म्हातोबाची (ता.हवेली) येथे शनिवारी (ता.२८) मुक्कामी जाणार आहे.