केडगाव : दौंड तालुक्यातील एकेरीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडे बाजार व खाऊगल्लीचे आयोजन केले होते. त्याला पालक व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले.
शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत आठवडे बाजार व खाऊ गल्लीचे आयोजन गुरुवार (ता. १८) सकाळी १० वा. ते १ पर्यंत केले होते. या आठवडी बाजारात विविध खाद्यपदार्थ, पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. शाळेतील शिक्षक, पालक, युवक कार्यकर्त्यांनी बाजारासाठी भाजीपाला जमा केला होता. यात सुमारे २४ ते २५ हजार रुपयाची उलाढाल झाल्याचा अंदाज शिक्षकांनी व्यक्त केला.
या आनंद बाजाराच्या माध्यमातून नफा-तोटा यासारख्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, स्वकमाई व स्वयंरोजगार याचे संस्कार मिळावे, श्रमाचे महत्त्व समजावे तसेच विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढीस भर पडावी, या उद्देशाने बाजाराचे आयोजन केल्याचे शिक्षक गणेश शेलार यांनी सांगितले.
या उपक्रमाचे सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, आदींनी कौतुक केले. आनंद बाजार यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक सुहास चौधरी शिक्षक मधुकर गिरमे, गणेश शेलार, महादेव पंडित, अंजली पंडित, मनीषा माने, महारनवर आदींनी प्रयत्न केले.
संतुलित आहाराविषयी माहितीसाठी आठवडे बाजार
विद्यार्थ्यांचे व्यवहार कौशल्य, नम्रता, संभाषण, आत्मविश्वास, गणनक्रिया, धीटपणा आदी गुणांचा विकास व्हावा, तसेच संतुलित आहाराविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी हा आठवडे बाजार भरवण्यात आला होता.
– सुहास चौधरी, मुख्याध्यापक, जि. प. शाळा एकेरीवाडी
शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत आठवडे बाजारचे आयोजन
शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत आठवडे बाजारचे आयोजन केल्याने मुलांच्या व्यवहार ज्ञानामध्ये नक्कीच भर पडली असणार. मुलांना आठवडे बाजार कसा चालतो? पैसे कसे हाताळावे? आर्थिक ताळेबंद कसा जमवावा याचे चांगले धडे मिळाले.
– सुधीर टूले, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती